आगामी २०१९ मध्ये होणार्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार रावसाहेब दानवे यांना ‘चकवा’ देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर मैदानात उतरणार आहेत. खासदार दानवेंचा पराभव करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने खलबते सुरू झाली आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रीत प्रयत्न करीत असेल तर आगामी निवडणूक भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांना चांगलीच डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.
लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. सर्व
पक्षांकडून मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जालना लोकसभा मतदार संघात
जालना जिल्हा व औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण, औरंगाबाद तालुक्यातील गावांसह शहरातील
काही महानगरपालिका वॉर्डांचा समावेश आहे. सध्या सिल्लोड,
सोयगाव विधानसभा
मतदार संघ काँग्रेसकडे आहे. पैठण शिवसेनेकडे तर फुलंब्री भाजपकडे आहे. भाजपकडून
खासदार रावसाहेब दानवे हे या लोकसभेसाठी पाचव्यांदा उमेदवार आहेत. सलग
चारवेळा ते या मतदार संघातून निवडून आलेले आहेत. सध्या ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शपथ
घेतली आहे. तर गतवर्षी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यासाठी सेनेने
पक्षाच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव निश्चित केले आहे. त्यादृष्टीने
खोतकर यांनी गतवर्षापासून जालना लोकसभा मतदार संघात दौरे सुरू केले आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेच्या मतावर खासदार दानवेंना पराभूत केले जाऊ शकत नाही. यासाठी
खोतकर यांनी काँग्रेस पक्षातील व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांशी संपर्क
साधून खासदार दानवेंना पराभूत करण्यासाठी व्युहरचना केली असल्याचे बोलले जाते.
खासदार दानवेंच्या तालुक्यात येऊन दिले
आव्हान
आमदार अब्दुल सत्तार आणि राज्यमंत्री खोतकर
यांच्यातील वाढती मैत्रीही वेळोवेळी समोर आली आहे. नुकतेच सिल्लोडमध्ये आमदार सत्तार
यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना निमंत्रित केले होते. त्यास खोतकरांनी
आवर्जून उपस्थित राहत तेथे केलेल्या भाषणात खासदार दानवे यांच्यावर टीका केली
होती. शुक्रवारी (ता.१६) खोतकर हे भोकरदन तालुक्याच्या दौर्यावर आले होते. पारध
येथील दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आटोपून ते भोकरदन येथे आले. तेथे त्यांनी
पत्रकारांशी वार्तालाप करताना खासदार दानवे यांच्या तालुक्यातच लोकसभेची निवडणूक
लढविणार असल्याचे जाहीर केले. खोतकर यांच्यासोबत पारधमधील कार्यक्रमात भोकरदनचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हेही होते. त्यामुळे तालुक्यात
चर्चेला उधान आले आहे.
मैत्रीपूर्ण लढत
शिवसेना आज तरी भाजपसोबत युती करणार नाही असे
नेत्यांकडून सांगितले जात आहे. पण यदाकदाचीत युती झाली तर आपण शिवसेना नेत्यांची परवानगी
घेऊन दानवे यांच्याविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही खोतकरांनी सांगितले आहे.
त्यामुळे दानवे यांना ‘चकवा’ देण्यासाठी खोतकरांनी काँग्रेस,
राष्ट्रवादी
काँग्रेस सोबत राजकीय खलबते केले असल्याचे सिद्ध होत आहे. शिवसेना, काँग्रेस,
राष्ट्रवादी
काँग्रेस जर एकत्रीत आले तर खासदार दानवे यांना शेतकऱ्यांना ‘साले’ म्हटल्याची
किंमत चुकवावी लागू शकते.